vimarsana.com


दूरदृष्टी, पक्षीय बांधणी, लोकहीत, समाजहीत आणि विकास यांचा सुंदर मेळ घालायचा असेल, तर एक चांगली टीम सोबत असणे फार महत्त्वाचे आहे, याची पुरेपूर जाण असल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नेतृत्वाखालील सरकारच्या दुसऱ्या टप्प्यांतील पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात या सर्व बाबींचा सर्वंकष विचार केलेला दिसला. देशाचा सर्वांगीण आणि भक्कम विकास साधायचा असेल, तर आपल्या मंत्रिमंडळात सर्व राज्यांना आणि त्या अनुषंगाने विविध जाती- जमाती यांना प्रतिनिधित्व देऊन सामाजिक अभिसरणाचा प्रयोग करणे आवश्यक असल्याचे ध्यानी घेऊन पंतप्रधान मोदी यांनी हा मंति्रमंडळ विस्तार केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलात एकूण ४३ जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. त्यात महाराष्ट्रातील ४ खासदारांना संधी मिळाली असून खासदार नारायण राणे, खासदार कपिल पाटील, खासदार डॉ. भागवत कराड आणि खासदार डॉ. भारती पवार यांचा समावेश आहे. या चौघांना केंद्रीय मंत्रीपदाची संधी देण्यामागे आगामी महापालिका निवडणुकांसह जातीय समीकरणाचाही विचार करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. आगामी काळात महाराष्ट्रात होणाऱ्या काही प्रमुख महानगरपालिका आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता भाजपच्या नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिल्याचे दिसत आहे. खरं म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराचा हा दिवस राणे कुटुंबीयांसह कोकणवासीयांसाठी शुभ दिवस ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी राणे साहेबांवर मोठी जबाबदारी टाकली असून त्या जबाबदारीला आणि पदाला १०० टक्के न्याय देण्याचे काम राणे साहेब करतील आणि आपली जबाबदारी चोख पार पाडून स्वत:ची छाप पाडतील, याबाबत कोणाच्या मनात संदेह नाही. कोकणात शिवसेनेला शह देण्यासाठी आणि भाजपचा अधिक प्रसार करण्यासाठी नारायण राणे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांचा मुंबईतील दबदबा पाहता भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने शिवसेनेला जोरदार टक्कर देण्याचा भाजपचा प्रयत्न दिसत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे केंद्रात मंत्री झाले असले तरी या संधीचे संकेत राणे यांना सहा महिने आधीच मिळाले होते. राणे यांच्या आमंत्रणावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्गात आले होते, तेव्हा जाहीर कार्यक्रमात बोलताना राणे यांच्या भाजपमधील पुढील वाटचालीबाबत शहा यांनी सूचक वक्तव्य केले होते. नारायण राणे यांनी सिंधुदुर्गात उभारलेल्या मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी ७ फेब्रुवारी रोजी अमित शहा आले होते. त्यावेळी बोलताना शहा यांनी राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले होते. शिवसेनेवर तोफ डागतानाच शहा यांनी राणे यांच्या आव्हानात्मक राजकीय प्रवसावरही भाष्य केले होते. नारायण राणे हे अन्यायाविरुद्ध लढणारे आणि घट्ट पाय रोवून उभे राहणारे नेते आहेत. अन्याय होत असेल तर ते कोणताही विचार न करता त्याचा प्रतिकार करतात. या कारणामुळेच त्यांची आतापर्यंतची वाटचाल वळणावळणाची राहिली आहे. मात्र, भाजपमध्ये त्यांच्याबाबतीत असे होणार नाही. त्यांचा भाजपात आदर आणि सन्मानच होईल. त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याची ग्वाही मी देत आहे, असे शहा म्हणाले होते. या वक्तव्यातून शहा यांनी एकप्रकारे राणे यांना मानाचे पद देण्याचेच संकेत दिले होते. त्यामुळे राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली असताना त्यामागे कुठेतरी अमित शहा असल्याचे स्पष्ट होत आहे. दुसरीकडे खासदार कपिल पाटील यांना मोठे अधिकार दिल्यास ठाणे जिल्ह्यात एक नेतृत्व तयार होण्यास मदत होईल आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला तगडे आव्हान उभे राहू शकेल. तसेच येणाऱ्या निवडणुकीत त्याचा भाजपला फायदा होईल. त्यामुळे कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याचे दिसत आहे. राज्यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. अशावेळी डॉ. भागवत कराड यांना संधी देण्याचे काम भाजपने केले आहे. भागवत कराड हे मराठवाड्यातील ओबीसींचे मोठे नेते आहेत. सध्या ओबीसी आरक्षणावरून निर्माण झालेला वाद पाहता ओबीसी नेत्यांना सोबत ठेवण्याचे काम भाजपने केले आहे. तसेच कराड यांना मंत्रीपद दिल्याने मराठवाड्यात भाजपची ताकद वाढणार असल्याचेही स्पष्ट होत आहे. महिलांचे सक्षमीकरण आणि महिलांना अधिकाधिक संधी देण्याचा मोदी यांचा विचार स्पष्ट दिसत आहे. कारण मंत्रिमंडळ विस्तारात यावेळी त्यांनी ११ महिलांना संधी दिली आहे. महाराष्ट्रातील दिंडोरीच्या खासदार डॉ. भारती पवार यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. भारती पवार या सुशिक्षित महिला लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे भाजप सरकारमध्ये महिलांना योग्य स्थान आणि त्यांचा योग्य तो सन्मान केला जातो, असा संदेश या माध्यमातून देण्यात आल्याचे उघड होत आहे. इतकेच नाही, तर केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतलेले महाराष्ट्रातील चारही नेते हे इतर पक्षांतून भाजपात आलेले आहेत. त्यामुळे इतर पक्षांतून भाजपात आलेल्या नेत्यांचाही योग्य तो विचार केला जातो आणि त्यांनाही मंत्रीपद दिले जाते, असा सूचक संदेश देण्याचे काम या माध्यमातून करण्यात आल्याचे दिसत आहे. मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनुसूचित जाती-जमातीच्या नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात अनुसूचित जातींचे १२ सदस्य, तर आठ सदस्य अनुसूचित जमातींमधून असतील. विस्तार झाल्यानंतर मोदी सरकारमध्ये ओबीसींमधील एकूण २७ मंत्री आहेत. शिवाय मंत्रिमंडळाचा सुशिक्षित असा चेहरा समोर यावा म्हणून कॅबिनेटमध्ये उच्चशिक्षित नेत्यांना सामावून घेण्यात आले आहे. मंत्रिमंडळात एकूण १३ वकील, सहा डॉक्टर, पाच इंजिनीअर आणि सात सनदी अधिकारी यांना स्थान देण्यात आले आहे. नव्या मंत्रिमंडळात तरुणांना संधी देण्याचा जास्त प्रयत्न आहे. त्यामुळे ५० पेक्षा कमी वय असणाऱ्या १४ नेत्यांना संधी देण्यात आली असून प्रशासकीय अनुभवासाठी ३९ माजी आमदार आणि चार माजी मुख्यमंत्री मंत्रिमंडळ विस्ताराचा भाग असतील. याशिवाय अल्पसंख्याक समाजातील नेत्यांनाही मंत्रिमंडळात समावून घेतले आहे. ख्रिश्चन, मुस्लीम आणि शीख समाजातील प्रत्येकी एक आणि बौद्ध समाजातील दोन नेत्यांना संधी देण्यात आली आहे. तसेच ईशान्य भारतातील पाच खासदारांना मंत्रीपदे देण्यात आली असून क्षेत्रिय समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अशाप्रकारे पंतप्रधान मोदी यांनी नव्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्वांगसुंदर मेळ घातलेला दिसत आहे.

Related Keywords

Shiv ,Rajasthan ,India ,Konkan ,Maharashtra ,Mumbai ,Narendra Modi ,Narayan Rane ,Eknath Shinde ,Bhagwat Karad , ,Prime Minister Narendra Modi ,Prime Minister Modi ,India Pawar ,Rane Sir ,Konkan Shiv Sena ,Mumbai August ,Shiv Sena ,Central Home ,Thane District ,Urban Development ,Minister Eknath Shinde ,Dev Patil ,Feeding Marathwada ,ஷிவ் ,ராஜஸ்தான் ,இந்தியா ,கொங்கன் ,மகாராஷ்டிரா ,மும்பை ,நரேந்திர மோடி ,நாராயண் றானே ,பகவத் காரட் ,ப்ரைம் அமைச்சர் நரேந்திர மோடி ,ப்ரைம் அமைச்சர் மோடி ,மும்பை ஆகஸ்ட் ,ஷிவ் சேனா ,மைய வீடு ,தானே மாவட்டம் ,நகர்ப்புற வளர்ச்சி ,

© 2024 Vimarsana

vimarsana.com © 2020. All Rights Reserved.