July 13, 2021
21
सिंध प्रांतातील धक्कादायक घटना – धर्मांतराची चित्रफित फेसबुकवर पोस्ट
वृत्तसंस्था/ कराची
Advertisements
‘नवे पाकिस्तान’ निर्माण करण्याचे आश्वासन देत सत्तेवर आलेले पंतप्रधान इम्रान खान यांच्या राजवटीतही हिंदूवर अत्याचार तसेच त्यांच्या बळजबरीच्या धर्मांतराचे सत्र सुरूच आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात 60 हिंदूंचे बळजबरीने धर्मांतर करविण्यात आले आहे. बळजबरीचे धर्मांतर घडवून आणणाऱया अब्दुल रऊफ निजामानीने फेसबुकवर या धक्कादायक घटनेची चित्रफित पोस्ट केली आहे.
माझ्या देखरेखीत 60 जण मुस्लीम झाले असून त्यांच्यासाठी प्रार्थना करा असेही त्याने म्हटले आहे. अब्दुल रऊफच्या फेसबुक प्रोफाइलनुसार तो सिंधच्या मतली येथील नगरपालिकेचा अध्यक्ष आहे. चित्रफितीत धर्मांतराचा प्रकार दिसून येतो. पाकिस्तान पीपल्स पार्टीचे उपाध्यक्ष सुखदेव हेमनानी यांनी स्थानिक अधिकाऱयांकडून घटनेसंबंधी माहिती घेत असल्याचे म्हटले आहे.
चालू वर्षी मार्च महिन्यात 13 वर्षीय हिंदू मुलीचे अपहरण करण्यात आले होते आणि तिचे बळजबरीने धर्मांतर घडवून आणले गेले होते. या मुलीचे नाव कविता ओआद होते, जी कंधकोट भागातील रहिवासी होती. तिच्या धर्मांतराची चित्रफित देखील व्हायरल झाली होती. ही चित्रफित पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी शेअर केली होती. या मुलीला जमावाने घेरले होते आणि मुलगी जमिनीवर बसली होती. हे धर्मांतर मियां मिट्ठूने घडवून आणले होते. तो भारचुंदी येथील मौलवी आहे. मियां मिट्ठू सिंध भागात अपहरण आणि धर्मांतरासाठी कुख्यात आहे. गरीब हिंदू मुलींना तो लक्ष्य करत असतो. पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येत हिंदूंचे प्रमाण सुमारे 2 टक्के म्हणजेच 45 लाख आहे. यातील बहुतांश लोक सिंध प्रांतात राहतात.
Share