July 17, 2021
7
पेडणेत केली इंचाची शंभरी पार : ऑरेंज अलर्ट 19 जुलैपर्यंत
प्रतिनिधी /पणजी
Advertisements
राज्यात पावसाचा जोर सुरूच असून आषाढी एकादशीपर्यंत जोर कायम राहील. गेल्या 24 तासांत सरासरी 2.5 इंच पाऊस झाला असून राज्यात आतापर्यंत पडलेला पाऊस 67 इंच झाला आहे. उत्तर गोव्यात 71 इंच पाऊस पडलेला आहे. तर दक्षिण गोव्यात 62 इंच पाऊस पडला. आगामी 24 तासांत जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
राज्यात पाऊस नॉन स्टॉप पडत आहे. यावर्षी सरासरीपेक्षा 8 इंच जादा पाऊस पडलेला आहे. गेल्या 24 तासांत पणजीत व वास्कोत 2.5 इंच पावसाची नोंद झालेली आहे. शुक्रवारी स. 8.30 ते सायं. 5.30 या दरम्यान सुमारे 3 इंच पावसाची नोंद झालेली आहे. पणजी वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार दि. 19 जुलैपर्यंत राज्यात ऑरेंज अलर्ट जारी राहील. गेल्या 24 तासांत म्हपसा, वाळपई, पेडणे येथे प्रत्येकी 8 सेंमी. सांखळी, दाबोळी, मुरगाव व केपे येथे प्रत्येकी 7 सेंमी पाऊस पडला. पणजी जुनेगोवे, काणकोण येथे प्रत्येकी 6 सेंमी, मडगाव व सांगे येथे प्रत्येकी 5 सेंमी पावसाची नोंद झाली. आगामी दि. 19 पर्यंत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडणार. त्याचबरोबर वाऱयाचा वेग ताशी 40 ते 50 किमी एवढा वाढणार.
पेडणेत 100 इंच पाऊस
अल्पावधीत 100 इंच पावसाचे उद्दीष्ट करणारे पेडणे हे गोव्यातील पहिले केंद्र ठरले आहे. काल सकाळ 8.30पर्यंत पेडणे 97.70 इंच एवढी पावसाची नोंद झाली होती. दिवसभरात 3 इंच पडलेल्या पावसामुळे पेडणे केंद्राने इंचाची शंभरी गाठली. जुलैच्या 16 तारखेला 100 इंच गाठलेले आहेत. तर पाऊस संपायला अद्याप अडीच महिने शिल्लक आहेत. त्यामुळे यावर्षी पेडणेत 250 इंच पाऊस होईल की काय ! असे वाटते. राज्यातील इतर केंद्रांमध्येही पावसाची विक्रमी नोंद झालेली आहे.
Share
previous post