The Path Of Appointment Of 817 Posts Of MPSC Was Finally Cleared
दिलासा:एमपीएससीच्या 817 पदांच्या नियुक्तीचा मार्ग अखेर मोकळा, सामान्य प्रशासन खात्याने काढला शासन निर्णय
नाशिक11 तासांपूर्वी
कॉपी लिंक
उपमुख्यमंत्री पवारांनी काढला तांत्रिक अडचणींतून मार्ग
पुण्यातील स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर उफाळून आलेल्या राज्य लोकसेवा आयोगाच्या रखडलेल्या नियुक्त्यांचा प्रश्न सुटण्याच्या वाटेवर आला आहे. निवड प्रक्रिया पूर्ण होऊन निव्वळ नियुक्तिपत्रांमुळे अडलेल्या ४१३ उमेदवारांसह अन्य परीक्षेत निवडलेल्या गेलेल्या परंतु नियुक्ती रखडलेल्या एकूण ८१७ उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग सामान्य प्रशासन खात्याने १५ जुलै काढलेल्या शासन आदेशाने मोकळा केला आहे.
“नियुक्ती पत्र द्या किंवा आत्महत्येची परवानगी द्या,’ या मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या पत्राने पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला होता. निमित्त होते, स्वप्निल लोणकर या उमेदवाराने राज्य लोकसेवा आयोगाच्या नियुक्तीस झालेल्या विलंबाला कंटाळून केलेल्या आत्महत्येचे. आयोगावरील रिक्त पदे, आरक्षणाबाबत न्यायालयाचे आदेश या कचाट्यात सापडलेल्या या नियुक्त्या रखडल्याने राज्यातील अनेक तरुणांना नैराश्याने घेरले होते. स्वप्निलच्या निमित्ताने हा असंतोष बाहेर आल्यावर महाविकास आघाडी सरकारला त्याची दखल घ्यावी लागली.
सुधीर मुनगंटीवार यांनी मांडल्या होत्या व्यथा
भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत या उमेदवारांच्या व्यथा मांडल्यावर त्यावर तत्काळ तोडगा काढण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात केली होती. त्यावर आयोगाचे अध्यक्ष व सामान्य प्रशासन विभागाचे सचिव स्तरावरील अधिकारी यांच्याशी बैठका घेऊन उपमुख्यमंत्री पवार यांनी आरक्षणाच्या तांत्रिक मुद्द्यावर तोडगा काढून या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा केला आहे. दरम्यान, स्वप्निल याच्या आत्महत्येनंतर राज्यभरातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणारे उमेदवार एकवटले होते. तसेच पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे मराठवाड्यातील अनेक तरुण-तरुणी हे आपआपल्या गावात परतले आहेत. यातील अनेकांना नैराश्य आल्याचेही पहायला मिळाले. मात्र, या निर्णयामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आमचे नुकसान टाळले
एमएसएसीच्या २०१९ सालच्या नियुक्त्यांचा हा विषय न्यायालयाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर खूप किचकट झाला होता. उपमुख्यमंत्री पवार यांनी यातील तपशील समजून घेऊन कुणाचेही नुकसान होणार नाही या पद्धतीने हा प्रश्न मार्गी लावला आहे. त्याबद्दल आम्ही सर्व भावी अधिकारी त्यांचे आभार मानतो. -राहुल झाल्टे, पोलिस उपअधीक्षकपदी निवड
दोन दिवसांत प्रश्न निकाली
१३ जुलै रोजी शासनातर्फे बोलावण्यात आलेल्या बैठकीत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मला निमंत्रित करण्यात आले होते. त्या वेळी शासनाने नेमका प्रश्न काय व त्यावरील तोडगा काय हे जाणून घेतले. न्यायालयाचे आदेश व या रखडलेल्या नियुक्त्या यांचा सारासार विचार करून रखडलेल्या उमेदवारांना न्याय मिळवून देण्यासाठी संधी दिली. -अजित दिवटे, तहसीलदारपदी निवड
बातम्या आणखी आहेत...