संचारबंद

संचारबंदीचा आदेश झुगारून सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चा


सोलापूर (सूर्यकांत आसबे): आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या मराठा समाजाला रद्द झालेले आरक्षण पुन्हा मिळावे, या प्रमुख मागणीसाठी माजी आमदार नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली रविवारी संचारबंदीचा आदेश झुगारून सोलापुरात मराठा आक्रोश मोर्चा निघाला. सोलापूर पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली होती. तरीही संयोजक मोर्चा काढण्यावर ठाम राहिल्यामुळे पोलिसांची मोठी पंचायत झाली. सोलापूर आणि जिल्हाभरातून हजारो मराठा आंदोलक सोलापुरात येणार असल्याने मोर्चाला नेमके कसे रोखायचा असा प्रश्न पोलिसांसमोर होता. त्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आणि पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शहर आणि ग्रामीण भागात ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. प्रत्येक मार्गावर पोलीस बंदोबस्त लावल्याने आंदोलकांना सोलापूर शहरात येता आले नाही.
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चाचा समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ झाला. मोर्चाच्या सर्वात समोर आणि दोन्ही बाजूला ११० पोलीस अधिकारी, १२०० पोलीस अंमलदार, ५०० होमगार्ड जवान तसेच एसआरपीच्या तीन तुकड्या यांसह शहर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.
या मोर्चामध्ये माढा मतदारसंघाचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सोलापूरचे भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, सोलापूर विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, माळशीरसचे भाजप आमदार राम सातपुते आदी उपस्थित होते. मोर्चा संपल्यानंतर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे प्रमुख आठ मागण्यांचे निवेदन सोपवले.
अधिवेशनावर धडक मारणार
सोलापुरातील आंदोलन दडपण्याचा प्रयत्न आम्ही हाणून पाडण्यात यशस्वी झाल्याचे माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकार ब्रिटिशांपेक्षासुद्धा वाईट वागणूक मराठा समाजाला देत असल्याचा आरोप त्यांनी केला. आमचे आंदोलन संपलेले नाही, असे सांगत आता मराठा आक्रोश मोर्चा अधिवेशनावर धडकणार असल्याचा इशारासुद्धा नरेंद्र पाटील यांनी दिला.
आरक्षण आमच्या हक्काचं…
आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा, लाख मराठा, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहात नाही, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, नरेंद्र पाटील तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा आंदोलकांनी यावेळी दिल्या. घोषणांनी संभाजी महाराज पुतळा परिसर दणाणून गेला होता.

Related Keywords

Solapur , Maharashtra , India , Madha , Ram Satpute , Shivaji Maharaj , Narendra Patil , , Collector Milind , சோலாப்பூர் , மகாராஷ்டிரா , இந்தியா , மாதா , ரேம் சாட்புத்தே , சிவாஜி மகாராஜ் , நரேந்திர பாட்டீல் ,

© 2025 Vimarsana