July 15, 2021 18 उच्च न्यायालयाची टिप्पणी- दिल्ली पोलिसांना ठोठावला 25 हजारांचा दंड वृत्तसंस्था/ नवी दिल्ली Advertisements मागील वर्षी दिल्लीत झालेल्या दंगलींशी संबंधित एका प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने पोलिसांवर 25 हजार रुपयांचा दंड ठोठावत करण्यात आलेला तपास हास्यास्पद असल्याची टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयाने घोंडा येथील रहिवाशाच्या मागणीनुसार गुन्हा नोंद करण्यास सांगितले होते. दंगलींदरम्यान डोळय़ाला गोळी लागल्याचे या व्यक्तीने म्हटले होते. दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंद करण्याच्या आदेशास विरोध दर्शविला होता. याप्रकरणी उच्च न्यायालयाने बुधवारी दिल्ली पोलिसांवर कठोर टिप्पणी केली आहे. पोलिसांनी स्वतंत्र एफआयआरमध्ये आरोपींना वाचविण्याचा मार्ग तयार केल्याचे वाटत आहे. पोलीस अधिकारी स्वतःच्या तपासादरम्यान घटनात्मक कर्तव्य पार पाडण्यास अपयशी ठरल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले. नागरिकत्व कायद्याच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांदरम्यान उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये मागील वर्षी 24 फेब्रुवारी रोजी दंगली भडकल्या होत्या. यात 53 जणांचा मृत्यू झाला होता. तर 200 हून अधिक जण जखमी झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी 751 एफआयआर नोंदविले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने भजनपुरा पोलीस स्थानकाचे प्रमुख आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱयांवर हा दंड ठोठावला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस आयुक्तांच्या नजरेखालूनही जावा असे म्हणत न्यायालयाने त्यांना या आदेशाची प्रत पाठविली आहे. Share