प्रतिनिधी/ कराड कराड तालुक्याला गेल्या महिन्यापासून कोरोना रुग्णवाढीचा फटका बसला आहे. तो कायम असतानाच शुक्रवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाचा जोर वाढल्याने कराड शहरासह तालुक्याचे जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले. शनिवारी पावसाचा जोर ओसरल्याने कराडकरांना दिलासा मिळाला. कृष्णा व कोयना नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली असली, तरी कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने महापुराचा धोका कायम होता. त्यामुळे स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळासह 59 घरे, दुकाने महापुराच्या पाण्यात गेली होती. Advertisements दरम्यान, आशियाई मार्गावर कराड हद्दीत साचलेले पावसाचे पाणीही ओसरल्याने महामार्ग मोकळा झाला होता. सेवारस्त्यांवरील पाणीही पूर्णतः कमी झाले होते. शुक्रवारी दिवसभर कराड शहरासह तालुक्यात पावसाचा जोर प्रचंड वाढलेला होता. दत्त चौक, पाटण कॉलनी, कृष्णा घाट, कुंभार पाणंद, जोशी बोळ, पाटण कॉलनी, प्रीतिसंगम बाग, बागेच्या रोडवरील दुकानगाळे, शाहू चौक परिसरातील घरांमध्ये महापुराचे पाणी घुसले होते. नदीकाठच्या कुटुंबांचे स्थलांतर केले होते. शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर पूर्ण ओसरला होता. त्यामुळे शहरातील कोल्हापूर नाका ते मलकापूर दोन्ही बाजूच्या सेवारस्त्यावरील पाणी कमी झाले होते. पोपटभाई पेट्रोलपंप चौक परिसरातील पाणीही कमी होते. मात्र पाण्यामुळे कचरा, दारूच्या, पाण्याच्या बाटल्यांसह प्लास्टिक कचरा रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरला होता. तो काढण्याचे काम नगरपरिषद आरोग्य विभागाचे कर्मचारी सकाळपासून करत होते. दत्त चौकातील साई मंदिर परिसरातील महापुराचे पाणी ओसरायला सुरुवात झाली होती. समाधीस्थळासह प्रीतिसंगम बाग पाण्यात शनिवारी कराड परिसरात पावसाचा जोर ओसरला असला, तरी नदीच्या पाण्याचा फुगवटा कायम होता. स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळासह प्रीतिसंगम बाग रोडवरील दुकाने, घरांमध्ये महापुराचे पाणी घुसले होते. हे पाणी ओसरायला सुरुवात झाली होती. मात्र पूर्णतः पाणी न ओसरल्याने अनेक घरांसह दुकानांचे नुकसान झाले. घुसलेले पाणी कमी होत होते. त्याचा पंचनामा करण्याचे काम सकाळपासून सुरू होते. तहसीलदार अमरदीप वाकडे, मुख्याधिकारी रमाकांत डाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी पाणीपातळीवर लक्ष ठेवून नागरिकांना सूचना देत होते. चौकट नदीकाठावरील बंदोबस्त कायम शनिवारी पावसाचा जोर ओसरल्याने नद्यांच्या पाणीपातळीत घट झाली असली तरी कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर कमी जास्त होत असल्याने महसूल व पोलीस प्रशासन शनिवारीही अलर्ट होते. शुक्रवारी नदीकाठावर ठेवलेला पोलीस बंदोबस्त शनिवारीही कायम होता. जोपर्यंत धोका पूर्ण टळत नाही तोपर्यंत नागरिकांनी खबरदारी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले. नदीच्या पाण्याचा फुगवटा कायम शनिवारी दुपारपर्यंत कृष्णा व कोयना नदीच्या पाण्याचा फुगवटा कायम होता. कोयना धरण क्षेत्रातील पावसाचा जोर जसजसा कमी होईल, तसे पाण्याचा फुगवटा काही प्रमाणात कमी होत होता. त्यामुळे शनिवारीही कराड शहरासह कराड तालुक्यातील तांबवेसह इतर गावांचा धोका कायम होता. Share previous post next post