चिपळूण/ प्रतिनिधी रायगडनंतर चिपळूणमधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. सर्वत्र भयावह परिस्थिती आहे. चिपळूण असो अथवा अन्य ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे जे नुकसान झाले आहे, त्याबद्दल राज्याबरोबरच केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. Advertisements मंत्री राणे यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार नीलेश राणे, माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी रविवारी चिपळूणच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ते पुढे म्हणाले की, मी काही पाहणी दौरा वैगरे करायला आलो नाही. उद्ध्वस्त झालेली लोक ही माझ्या घरातील आहेत. बेघर झालेल्या माझ्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. कोकणातील पूरपरिस्थिती पाहिल्यानंतर आपण त्वरित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी मोदी यांनी मला कोकणात जाऊन पूरस्थितीची पाहणी करून अहवाल देण्यास सांगितले आहे. त्यामुळे या ठिकाणी कशा पद्धतीने मदत करता येईल, याची पाहणी केली आहे. व्यापारी व जनतेच्या डोळ्य़ात अश्रू बघून फार वेदना झाल्या आहेत. पूर भरल्यानंतर अडकलेल्या लोकांसाठी केंद्राने बोटी पाठवल्या, मात्र येथे आल्यानंतर त्या पाण्यात सोडल्या नाहीत. मात्र राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून मदत केली जाईल. केंद्राकडे असलेल्या योजनाही येथे राबवल्या जाणार आहेत. यासाठी मी केंद्रात आहे तर फडणवीस व दरेकर राज्यात असल्याचे त्यांनी सांगितले. बेजबाबदार अधिकाऱयांवर कारवाई झाली पाहिजे येथील प्रशासन बेजबाबदर आहे. मी या ठिकाणी आलो. एकही अधिकारी मला भेटला नाही. प्रांत, जिल्हाधिकारी येऊ शकले नाहीत. हे बेजबाबदार अधिकारी आहेत. पुरात उद्ध्वस्त झालेले लोक रडताहेत आणि अधिकारी दात काढताहेत. यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. चिपळूणमध्ये हे अधिकारी कसे राहतात, ते बघतो. त्यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय आपण गप्प राहणार नाही. मुख्यमंत्री पाहणीसाठी आले ते त्यांचे कामच आहे. पाहणी करतील आणि निघून जातील. त्याना सोडायला अधिकारी जातात. ते काय पाहुणे आहेत काय? माझा आज दौरा होणार म्हणून ते आले. त्यामुळे आजच ‘मातोश्री’चे दार उघडले आहे. नाहीतर ‘मातोश्री’चे दरवाजे बंद होते. हे बाहेर कधी पडले आहेत काय? आजला राज्यात मुख्यमंत्री नाही व प्रशासनही अस्तित्वात नसल्याची जोरदार टीका त्यांनी केली. चिपळुणात पाणी भरून पूर येतो. हे बाहेरून येणारे पाणी कसे थांबवता येईल, या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. शिवाय वाशिष्ठी नदीचा गाळ काढण्यासंदर्भात योग्य उपाययोजना करण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या काळात सांगलीला महापुरावेळी नियमाबाहेर जाऊन मदत केली होती. तशीच मदत यावेळी राज्याने केली पाहिजे. गेल्या 2 वर्षात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्यात. आता काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे सांगतानाच पूरग्रस्तांना मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. Share previous post next post