vimarsana.com


वृत्तसंस्था/ दुशांबे
Advertisements
तजाकिस्तानची राजधानी दुशांबेत अफगाणिस्तानविषयक शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) विदेशमंत्र्यांच्या संपर्क समुहाची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत सामील विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी अफगाणिस्तानसंबंधी भारताचा दृष्टीकोन जगासमोर मांडला आहे. जयशंकर यांनी तालिबानला हिंसेच्या माध्यमातून सत्तेवर आरुढ होण्यावरून इशारा देखील दिला. तर अफगाण नेत्यांना सर्व जातीय आणि धार्मिग गटांना सोबत घेऊन चालण्याचा सल्ला दिला आहे.
पूर्ण जग, हे क्षेत्र आणि अफगाणी लोक एक स्वतंत्र, तटस्थ, एकीकृत, शांततापूर्ण, लोकशाहीवादी आणि समृद्ध राष्ट्र इच्छितात. नागरिक आणि देशाच्या निवडून आलेल्या प्रतिनिधींच्या विरोधात हिंसा आणि दहशतवादी हल्ले रोखणे अत्यंत आवश्यक आहे. अफगाणिस्तानचा संघर्ष राजनयिक चर्चेद्वारेच सोडविला जाऊ शकतो. अफगाणिस्तानच्या सर्व पक्षांना सर्व जातीय समुहांच्या हितांचा आदर करावा लागेल. शेजाऱयांना दहशतवाद, फुटिरवाद आणि उग्रवादाचा धोका निर्माण होऊ नये हे देखील पहावे लागणार असल्याचे जयशंकर म्हणाले.
पाकिस्तान लक्ष्य
अफगाणिस्तानात अत्यंत वेगळय़ा अजेंडय़ासह काम करणाऱया शक्ती आहेत असे म्हणत विदेशमंत्र्यांनी अप्रत्यक्ष स्वरुपात पाकिस्तानला लक्ष्य केले आहे. याचमुळे सर्वात मोठे आव्हान गांभीर्य आणि प्रामाणिकतेने काम करण्याचे आहे. हिंसा आणि बळाद्वारे सत्ता हिसकाविण्याच्या विरोधात जग असल्याचे जयशंकर म्हणाले.
शांतता चर्चा एकमात्र पर्याय
प्रामाणिकपणे शांतता चर्चाच एकमात्र उत्तर असल्याचे विदेशमंत्र्यांनी तालिबान आणि अफगाण सरकारला उद्देशून म्हटले आहे. दोहा प्रक्रिया, मॉस्को मॉडेल आणि इस्तंबूल प्रक्रियेनुसार दोन्ही बाजूंना स्वीकारार्ह तोडग्याची गरज आहे. अफगाणिस्तानचे भविष्य त्याचा इतिहास असू शकत नाही. एका पूर्ण नव्या पिढीच्या वेगवेगळय़ा अपेक्षा असतात. त्यांना निराश करायला नको असे त्यांनी नमूद केले आहे.
सत्ता अन् शक्तीचे दोन ध्रूव
सध्या अफगाणिस्तानात सत्ता आणि शक्तीचे दोन ध्रूव असून यात निवडून आलेले सरकार आणि तालिबानचा समावेश आहे. निवडून आलेल्या सरकारसोबत भारत मागील 20 वर्षांपासून काम करत आहे. अफगाणिस्तानातील संसदेच्या उभारणीपासून धरण आणि रस्तेनिर्मितीपर्यंत अनेक प्रकल्पांमध्ये भारतीय इंजिनियर्स काम करत असून निधीही खर्च केला आहे. तर पाकिस्तान आणि तालिबानचे साटंलोटं जगजाहीर आहे.
तालिबानमुळे फटका
अफगाणिस्तानात तालिबान मजबूत झाल्यास हा भारतासाठी चिंतेचा विषय ठरणार आहे. तालिबान पारंपरिक दृष्टय़ा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या जवळ आहे. अशा स्थितीत तालिबान सत्तेवर आल्यास पाकिस्तानकडून भारताच्या हितसंबंधांना धक्का पोहोचविला जाऊ शकतो. अफगाणिस्तानच्या विकासासाठी भारताने अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
Share

Related Keywords

Moscow ,Moskva ,Russia ,Afghanistan ,Shanghai ,China ,India ,Pakistan ,Afghan , ,Afghanistan Parliament ,India Engineers ,மாஸ்கோ ,மோசிக்குவா ,ரஷ்யா ,ஷாங்காய் ,சீனா ,இந்தியா ,பாக்கிஸ்தான் ,

© 2024 Vimarsana

vimarsana.com © 2020. All Rights Reserved.