पणदेरी धरण धोकादायक, गळती सुरू : vimarsana.com

पणदेरी धरण धोकादायक, गळती सुरू


प्रतिनिधी/ मंडणगड
पाटबंधारेच्या मध्यम वर्गातील पणदेरी येथील 30 वर्षांच्या जुन्या मातीच्या धरणास सोमवारपासून मोठी गळती लागल्याने पंचक्रोशीत घबराट पसरली आहे. यावर्षीच्या उन्हाळय़ात धरणाचे मजबुतीकरण होऊनही गळती लागल्याने ती रोखण्यासाठी गेल्या 24 तासांपासून वरिष्ठ अधिकारी 100 कामगारांच्या माध्यमातून युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तिवरे धरण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून धरण पायथ्याच्या 200 लोकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे.
Advertisements
सुरक्षारक्षकामुळे टळला गंभीर प्रकार
नित्याप्रमाणे सोमवारी सकाळी धरणाचे सुरक्षारक्षक संजय पवार धरणावर आले. पावसाची नोंद घेतल्यानंतर धरणाच्या पाण्याची पातळी पाहण्यासाठी मुख्य भितींवर गेले. धरणातून जाणाऱया कालव्याच्या भिंतीवर पाणी पातळी नोंद घेताना तेथील पाणी चक्राकार फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सर्तकतेने पाहणी केली असता धरणाच्या पायथ्याशी कालव्याच्या मुखाजवळ मातीमिश्रीत पाणी मोठय़ा प्रमाणात वाहत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने ही बाब दूरध्वनीद्वारे लघुपाटबंधारे अधिकारी गोविंद श्रीमंगले यांना कळवली. घटनेचे गांभीर्य ओळखून अधिकाऱयांनी तांत्रिक लवाजमा गोळा करुन पणदेरी धरणाकडे धाव घेतली. पाहणीत धरणाला मोठी गळती लागल्याचे निष्पन्न झाले. यंत्रणा योग्यवेळी कार्यरत झाल्याने धरणफुटीचे संकट टळले आहे. त्यातच चार दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने हे काम वेगाने पार पाडता आले. धरण पूर्ण क्षमतेने भरले असून सांडव्यातून पाण्याचा विसर्ग मोठय़ा प्रमाणात सुरु झाला आहे
   
वरिष्ठ अधिकारी ठाण मांडून
धरणाला लागलेल्या गळतीनंतर दापोली प्रांताधिकारी शरद पवार, मंडणगड तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर यांच्यासह रत्नागिरी पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता वैशाली नाडकर, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, उपअभियंता गोविंद श्रीमंगले, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकुमार काशीद, पोलीस निरीक्षक उत्तम पठे, पोलीस निरीक्षक संजय आंब्रे, पोलीस उपनिरीक्षक सुशांत वराळे सध्या धरण परिसरात ठाण मांडून आहेत.
गळती रोखण्याचे काम युध्दपातळीवर
गळतीच्या ठिकाणी पिचिंगचे काम सुरू आहे. येथे मातीचा भराव केला जात आहे. पाण्याचा दाब कमी करण्यासाठी बेकरच्या मदतीने सांडव्याची उंची कमी करण्याचे काम सुरू आहे. शंभरहून अधिक कामगार यासाठी काम करीत आहेत. हे धरण 118.50 मीटर या पूर्ण क्षमतेने भरले असून पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक सुरूच असल्याने पाणीपातळी कमी करण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.
 
ग्रामस्थांचे स्थलांतर
प्रशासनास या संदर्भात माहिती मिळताच खडबडून जाग्या झालेल्या प्रशासनाने गळती थांबवण्यासाठी विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. गळतीमुळे जीवितहानी होऊ नये, यासाठी पणदेरी-बौध्दवाडी येथील 40 घरांतील 175 ग्रामस्थांचे पणदेरी-रोहिदासवाडी व कोंडगाव येथील काही ग्रामस्थ अशा एकूण 200 ग्रामस्थांचे पणदेरी जिल्हा परिषद मराठी शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे.
एनडीआरएफला पाचारण   
प्रशासनाकडून गळती काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरु असतानाच एन.डी.आर.एफ.ला पाचारण करण्यात आले आहे. तसेच पोलिसांची जादा कुमक घटनास्थळी दाखल होणार आहे. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा पणदेरी येथे भेट देण्यास निघाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, 2 दिवसांच्या अथक प्रयत्नानंतरही गळती थांबलेली नसल्याने परिसरात भीती वाढली आहे. 
पणदेरी धरणाचा तीस वर्षांचा प्रवास 
मध्यम माती धरण प्रकल्प असलेल्या पणदेरी धरण प्रकल्पावर गेल्या 30 वर्षात 6.85 कोटी रुपयांचा खर्च करुनही विविध कारणांनी प्रकल्प अर्धवट राहिला. धरणातील 4.01 दशलक्ष घनमीटर पाणी दरवर्षी वापराविना फुकट गेले. 1980 साली प्रशासकीय मान्यता व 1983 साली प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेल्या या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास 13 वर्षाचा कालावधी लागला व 1996 मध्ये घळ भरतीचे काम पूर्ण झाले. यानंतर पुढील 3 वर्षांच्या कालावधीत धरण महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले. कामास सुरुवात केल्यानंतर 16वर्षांनी म्हणजेच 1998 साली धरणावर 4.49कोटी रुपयांचा निधी खर्च झाला. धरण प्रकल्प महामंडळाकडे हस्तांतरित केल्यावर या धरणाचे उर्वरित काम अपेक्षित गतीने झाले नाही. सध्या मुख्य धरण, सांडवा, मुख्य विमोचक हे काम पूर्ण झाले आहे. धरण गळतीवर प्रतिबंधक उपाययोजना, कालव्यावरील पारेषण बांधकाम दुरुस्तीची कामे बाकी आहेत. 2010 अखेर धरण पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणे आवश्यक होते. मात्र 8 वर्षात निधीची तरतूद न झाल्याने काम कासवगतीने सुरु आहे. अंदाजपत्रक व फेरअंदाजपत्रकात वाढीव निधी खर्ची पडूनही मुळ उद्देशाप्रती काम नाही.
 
 जमीन अर्धवट अधिग्रहित
प्रकल्पासाठी 46.22 हेक्टर जमीन अधिग्रहित करणे अपेक्षित होते. यातील 42.65 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे, मात्र पुनर्वसनाचा नियम या धरणासाठी लागू पडलेला नाही. धरणात 4.01 दशलक्ष घनमीटर पाणी साठवून ठेवण्याची क्षमता आहे. या धरणामुळे पणदेरी, दंडीनगरी, बहिरवली, कोंडगाव या चार गावांतील 255 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.
तिवरे धरणफुटीतून बोध
चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून 23जणांचा बळी गेला होता. 2 जुलैला या दुर्घटनेला 2 वर्षे पूर्ण झाली. या दुर्घटनेला जलसंधारण खात्याचे अभियंता व ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला होता. या धरणाला लागलेल्या गळतीची माहिती देऊनही दुर्लक्ष केल्याने दुर्घटना घडल्याचा आरोप होता. या पार्श्वभूमीवर पणदेरी धरणाला लागलेल्या गळतीची प्रशासनाने तत्काळ दखल घेतली व गळती रोखण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले. सर्व वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. 
पणदेरी धरण प्रकल्प  
माती धरणाची लांबीः- 265 मीटर 
धरणाची उंचीः- 27.90 मीटर      
कालव्याची लांबीः- डावा कालवा 4 मीटर, उजवा कालवा 2.84 मीटर, 
पाणी साठवण्याची क्षमताः- 4.01 दशलक्ष घनमीटर, 
सिंचन क्षेत्र – 255 हेक्टर 
सिंचन क्षेत्राखालील गावेः- पणदेरी, दंडीनगरी, बहिरवली, कोंडगाव
Share

Related Keywords

Chiplun , Maharashtra , India , Ratnagiri , Orissa , Vaishali , Bihar , Mandangad , Laxmi Mishra , Dapoli Asia Sharad Pawar , Jagadish Patil , Zila Parishad Us School , Rs The Fund , Water Department , Clay Monday , Sanjay Pawar Dam , Due Leads , Zila Parishad , Collector Laxmi Mishra , Project Corporation , சிப்ளன் , மகாராஷ்டிரா , இந்தியா , ரதணகிரி , ஓரிஸ்ஸ , வைஷாலி , பிஹார் , மண்டங்கட் , ஜெகதீஷ் பாட்டீல் , தண்ணீர் துறை , களிமண் திங்கட்கிழமை , ஜில பரிஷாத் , ப்ராஜெக்ட் நிறுவனம் ,

© 2024 Vimarsana